मीरा भाईंदर – मीरा भाईंदर शहरात करोनाचे संकट वाढत असताना आता एक दिलासादायक बातमी आली आहे. आज एका दिवसांत तब्बल 55 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून आपल्या घरी परतले आहेत. मीरा भाईंदर शहरात आजघडीला 161 करोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. तर यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील 55 पॉझिटिव्ह रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या सर्वांना रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी आज टाळ्या वाजवून डिस्चार्ज दिला. यात 2 वर्षाच्या लहानगीपासून 60 वर्षांच्या वयोवृध्दापर्यंतच समावेश आहे. यावेळी पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे हे स्वतः उपस्थित होते. सध्या मीरा भाईंदरमध्ये करोना पॉझिटिव्ह बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 एवढी झाली आहे. तर 57 करोना बाधितांवर उपचार सुरु आहे.
मीरा भाईंदर शहरामध्ये पालिकेने कोविड-19 वर उपचार करण्यासाठी शहरात पंडित भीमसेन जोशी कोविड-19 रुग्णालया व्यतिरिक्त अन्य तीन रुग्णालय कोविड- 19 वर उपचार करणारी रूग्णालये घोषित केली आहेत. या हॉस्पिटलमध्ये वोकहार्ट, फॅमिली केअर आणि पी.बी. जोशी रुग्णालयचा समावेश आहे.