यंदा आत्तापर्यंत 55.88 दशलक्ष टन तांदळाची खरेदी

नवी दिल्ली – अन्न मंत्रालयाने चालू खरीप हंगामात आत्तापर्यंत 55.88 दशलक्ष टन तांदळाची खरेदी केली आहे. गेल्यावर्षी या काळात झालेल्या एकूण खरेदीच्या तुलनेत हे प्रमाण 27.15 टक्‍क्‍यांनी अधिक आहे.

एकूण जी सरकारी खरेदी झाली आहे त्यातील सुमारे 50 टक्के खरेदी पंजाब आणि हरियाना या दोन राज्यांमधून झाली आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अन्न मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून धान्य खरेदी केंद्रांची संख्या वाढवून केंद्र सरकार सरकारी खरेदीची प्रक्रिया मजबूत करीत आहे.

या धान्य खरेदीत पारदर्शकता आणली जात असून त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचाहीं वापर केला जात आहे असे त्यांनी सांगितले. पंजाब आणि हरियाना खेरीज उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड इत्यादी राज्यांतूनही तांदळाची खरेदी केली जाते. ही खरेदी एमएसपीच्या दराने केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही हित जपले जात आहे.

सध्या तांदळाच्या कॉमन व्हरायटीसाठी प्रति क्वींटल 1868 रूपये इतका एमएसपीचा दर आहे. यंदाच्या हंगामातील तांदुळ खरेदी साठी सुमारे एक लाख कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहितीही अन्न मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून एमएसपीच्या दराने धान्य खरेदी करून ते सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे नागरीकांना पोचवले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.