निकालाकडे लक्ष; भाजप, राष्ट्रवादीत चुरस
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या “प्रभाग क्र. 7 ब’ मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 9) उत्साही वातावरणात मतदान पार पडले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीसाठी मतदारांनी रांगा लावून मतदान केले. भाजपा आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून, कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. प्रभागातील एकूण 3 हजार 893 पैकी 2 हजार 129 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 54.68 टक्के इतके मतदान झाले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 7 ब मधील पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. पहिल्या दोन तासात 9.40 टक्के मतदान झाले. तर पुढील दोन तासात 20.57 टक्के मतदान झाले. यामध्ये 801 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 480 पुरुष व 321 स्त्री मतदारांचा सामवेश होता.
प्रभाग क्र. 7 मध्ये एकूण 3 हजार 893 मतदार असून, त्यामध्ये 2 हजार 94 पुरुष तर 1 हजार 799 महिला मतदारांचा समावेश आहे. तळेगाव स्टेशन येथील नवीन समर्थ विद्यालयातील 4 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शहराध्यक्ष संतोष दाभाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे, पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष व नगरसेवक गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, राजेंद्र जांभुळकर, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगलताई भेगडे, तळेगाव शहर महिला उपाध्यक्षा ज्योती शिंदे, तळेगाव शहर युवती अध्यक्षा निशा पवार हे आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तळ ठोकून होते. चुरशीच्या लढतीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.