विज्ञानविश्‍व: खुल्या अवकाशात 533 दिवस…

डॉ. मेघश्री दळवी

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) म्हणजे सगळ्यांची हक्काची प्रयोगशाळा. अवकाशात जाताना काय काय अडचणी येऊ शकतात, यासाठी चाचण्या घेतल्या जातात त्या याच अवकाश स्थानकात.
अलीकडेच जर्मन एरोस्पेस सेंटरने अवकाश स्थानकामध्ये एक अनोखी चाचणी पार पाडली. खुल्या अवकाशात जीवजंतू तग धरू शकतात का याची. अवकाशात अत्यंत कमी तापमान आणि प्रचंड अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा सहन करावा लागतो आणि अर्थात निर्वात पोकळी! तरीही काही सूक्ष्म जीवाणू या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिवंत राहिलेले आढळले आहेत. म्हणूनच या बायोमेक्‍स (बायोलॉजी अँड मार्स एक्‍सपेरिमेंट) प्रयोगात वेगवेगळे सूक्ष्मजीव अवकाशात किती काळ टिकून राहतात हे पाहण्यात आलं. त्यात जीवाणू, शैवाल, बुरशी असे सूक्ष्मजीव काही खनिजांमध्ये मिसळून अवकाश स्थानकाच्या झ्वेडा या मॉड्यूलवर बाहेरच्या बाजूने लावण्यात आले.

ते अवकाशातल्या खडतर परिस्थितीत 533 दिवस टिकून राहिले, हे एक प्रकारचं आश्‍चर्यच म्हटलं पाहिजे. या सूक्ष्मजीवांच्या जनुकांवर अवकाशातले अल्ट्राव्हायोलेट किरण आणि इतर विकिरणांचा काय परिणाम झाला आहे याचा आता तपशीलवार अभ्यास होईल. जनुकांमधले बदल किंवा उत्परिवर्तन (म्यूटेशन) यामुळे सूक्ष्मजीवांचे बाह्य गुणधर्म बदलतील का, हे बदल झाल्याने त्यांच्या जीवनक्रमात किंवा जीवनकालात काही फरक होईल का? अशा अनेक प्रश्नांचा वेध या प्रयोगातून घेण्याचा हेतू आहे. पुढे चंद्र, मंगळ किंवा गुरूचे चंद्र टायटन आणि युरोपा, शनीचा चंद्र एन्सेलेडस इथे वस्ती करण्याचा माणसाचा इरादा आहे. त्यामुळे या अभ्यासाचा उपयोग तिथल्या वसाहतींच्या योजना बनवताना होणार आहे.

पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती कशी झाली हा संशोधकांचा एक आवडता विषय आहे. त्यात अनेक वेगवेगळे सिद्धान्त मांडले गेले आहेत आणि त्यानुसार पुरातन काळाच्या पृथ्वीची निरनिराळी मॉडेल्स बनवून पाहण्यात आली आहेत. अमायनो ऍसिड्‌स आपोआप बनू शकतात किंवा जनुके आधी आणि मग त्यांच्यापासून हळूहळू मोठे जीव, इथपासून ते एलियन्सनी येऊन इथे जीव वसवले इथपर्यंत अनेक उत्पत्तीवाद प्रचलित आहेत. त्यातलं एक आहे पॅनस्पर्मिया. अवकाशात अनेक धूमकेतू, उल्का, अशनी फिरत असतात, त्यांच्यामार्फत सूक्ष्मजीव अवकाशात प्रवास करतात. अशीच एखादी अशनी पृथ्वीवर आढळली आणि तिच्यातून सूक्ष्मजीव पृथ्वीवर आले. इथे योग्य वातावरण मिळाल्याने ते फोफावले आणि मग उत्क्रांत होत गेले, हा पॅनस्पर्मिया सिद्धान्त. अवकाशात कोणत्याही संरक्षणाशिवाय सूक्ष्मजीवांचा निभाव लागत असेल, तर पॅनस्पर्मिया सिद्धान्ताला आधार मिळू शकतो.

बायोमेक्‍स प्रयोगाचा पुढचा टप्पा आहे बायोसाइन प्रयोग. यात खोल समुद्रात राहणाऱ्या सूक्ष्मजीवांना अवकाशात नेऊन त्यांचा असाच अभ्यास होणार आहे. युरोपा आणि एन्सेलेडस हे बर्फाळ आहेत. तिथल्या परिस्थितीत पृथ्वीवरचे हे सूक्ष्मजीव तग धरू शकतील असा अंदाज आहे. तिथे हे सूक्ष्मजीव अवकाशातल्या विकिरणांना तोंड देऊ शकतील का? याची खात्री असणे आवश्‍यक आहे, म्हणून बायोसाइन मोहीम महत्त्वाची आहे. त्यावेळी बायोमेक्‍स प्रयोगातल्या निरीक्षणांचा आणि निष्कर्षांचा वापर होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.