कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दमदार हजेरी
पुणे – हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार यंदा राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडला असून राज्यात सरासरीपेक्षा 53.8 मिलिमीटर अधिक पाऊस पडला असल्याची नोंद विभागातर्फे घेण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे. मात्र, अद्यापही सहा जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली नसल्याचे विभागाच्या नोंदीतून समोर आले आहे.
राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात 1 जून ते 6 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या तुलनेत सहा टक्के पावासाची नोंद झाली. या दरम्यान राज्यभरात 603.7 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत 657.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे.