नवी दिल्ली – वर्ष 2019 मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केलेला गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साजरा होत असतो. मात्र यंदा कोविड-19 च्या जागतिक महामारीने हा 51 वा फिल्म फेस्टीवल 16 ते 24 जानेवारी अशा नऊ दिवसांत पणजी येथे साजरा केला जाणार आहे. केंद्रिय माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निवडक प्रेक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ आणि समारोपाचे कार्यक्रम होतील; तर बहुतांश चित्रपटांचे प्रदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने होईल, असे जावडेकर म्हणाले.
गोव्याचा हा फिल्म फेस्टीवल केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली गोवा कला अकादमीच्या सहकार्याने आणि फिल्म अर्काईव्हज ऑफ इंडियाच्या सहयोगाने प्रतीवर्षी साजरा केला जातो. आपल्या स्थापनेची 50 वर्षे पूर्ण केलेल्या या महोत्सवाला केंद्र सरकारचे पाठबळ असल्याने साहजिकच हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा फिल्म फेस्टीवल मानला जातो.
एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ इंडियाचे गोव्याचे प्रमुख सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, यावर्षी जरी मर्यादित अभ्यागतांना पणजी येथे निमंत्रण दिले जाणार असले, तरी येणाऱ्या प्रत्येकाची करोनाटेस्ट आणि अन्य साथरोगविषयक चाचणी घेत सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे महोत्सव संयोजनात कोणतीही उणीव राहणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. या महोत्सवातील सर्वोत्तम चित्रपटाला “सुवर्ण मयूर’ अर्थात “गोल्डन पिकॉक’ पुरस्काराने गौरवले जाते.
गतवर्षी म्हणजे वर्ष 2019 मध्ये 108 देशांतील 2800 सिनेमे या महोत्सवात सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय सिनेमा, भारतीय सिनेमा, लघुपट, माहितीपट आणि विविध चर्चासत्रे यांची ही अनोखी मेजवानी सिनेरसिकांना 16 जानेवारीपासून मिळणार आहे. सध्या महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे.