22 केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल
नवी दिल्ली- नव्या मोदी सरकारमधील तब्बल 51 मंत्री करोडपती आहेत. तर 22 केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर गुरूवारी पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यांच्या समवेत 57 मंत्र्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. रामविलास पासवान आणि एस.जयशंकर वगळता मोदींसह इतर मंत्र्यांनी निवडणुकांवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची छाननी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केली. त्यानंतर एडीआरकडून मंत्र्यांच्या मालमत्तेबाबतची माहिती देण्यात आली. पासवान आणि जयशंकर सध्या लोकसभा किंवा राज्यसभा या संसदेच्या कुठल्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अभ्यासासाठी उपलब्ध झाले नाही.
एडीआरच्या अभ्यासानुसार 91 टक्के केंद्रीय मंत्री करोडपती आहेत. त्यांची सरासरी मालमत्ता 14 कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. अमित शहा, पियूष गोयल आणि हरसिम्रत कौर बादल यांच्यासह 4 मंत्री 40 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तेचे धनी आहेत. कैलाश चौधरी, रामेश्वर तेली आणि प्रतापचंद्र सारंगी यांच्यासह 5 मंत्र्यांनी त्यांच्याकडे 1 कोटी रूपयांपेक्षा कमी मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्र्यांपैकी 45 जणांचे वय 51 ते 70 वर्षांदरम्यान आहे. तर 11 मंत्री 41 ते 50 वर्षे वयोगटातील आहेत. केंद्रीय मंत्र्यांपैकी 47 जण शैक्षणिक पात्रतेचा विचार करता पदवीधारक आहेत. एका मंत्र्याने डिप्लोमा केलेला आहेत. तर उर्वरित 8 मंत्र्यांचे शिक्षण 10 वी ते 12 वी दरम्यानचे आहे.
केंद्रीय मंत्र्यांपैकी 22 जणांविरोधात म्हणजे 39 टक्के मंत्र्यांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील 16 मंत्र्यांविरोधात (29 टक्के) दाखल असलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. गंभीर गुन्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, जातीय सलोखा बिघडवणे, आचारसंहिता भंग आदींचा समावेश आहे. मागील वेळेच्या तुलनेत यावेळी गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांची संख्या 8 टक्क्यांनी वाढली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.