पुणे, दि. 17 -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या 50 पुण्यदशम बसच्या देखभाल दुरुस्तीचे (मेंटनन्स) काम आता ठेकेदारच पाहणार आहेत. त्यापोटी ठेकेदाराला प्रतिकिलोमीटर सात ते आठ रुपयांप्रमाणे दिवसाला 50 हजार रुपये पीएमपीला मोजावे लागणार आहेत. दरम्यान, या निर्णयावर विविध प्रवासी संघटनांनी टीका केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला 2021 मध्ये पुण्यदशमच्या 50 बस दिल्या होत्या. त्यानुसार 9 जुलैपासून पुण्यदशम बससेवा सुरू झाली. शहरातील नऊ मार्गांवर या बस सुरू आहेत. गेल्या वर्षभरात पुण्यदशममधून एक कोटी 35 लाख, 29 हजार 90 प्रवशांनी प्रवास केला आहे. त्यामधून सहा कोटी 67 लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळाले आहे. गेल्या वर्षात पुण्यदशमला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पीएमपीने या बसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्या ठेकेदाराला प्रतिकिलोमीटर सात ते आठ रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीएमपीकडे बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत तीन शिफ्टमध्ये सुमारे एक हजार कामगार काम करतात. वर्षभर या बसची देखभाल दुरुस्ती पीएमपीच्याच कार्यशाळेत करण्यात आली. आता या बसच्या मेन्टेनन्ससाठी ठेकेदाराची गरज का पडली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिवसाला 140 किमीचे पैसे
पुण्यदशमच्या 50 बसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदारासोबत सहा वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्यासाठी ठेकेदाराला प्रतिकिलोमीटर सात ते आठ रुपये दिले जाणार आहेत. दिवसाला 140 किलोमीटरचे पैसे ठेकेदाराला दिले जाणार आहेत.
बस खरेदी करताना ती दीर्घ कालीन हेतूने घ्यावी. त्यामुळे खरेदीच्या वेळीच त्याचा भविष्यात मेन्टेनन्स कोण करेल, त्यावर खर्च किती, संस्थेने करावा की कंत्राटदाराने याचा विचार होणे आवश्यक होते.
-प्रांजली देशपांडे,
वाहतूक तज्ञ
पुण्यदशमच्या बस आयसर कंपनीच्या आहेत. या केवळ 50 बस असल्यामुळे त्यांचा इनव्हेंटरी खर्च अधिक होता. त्यामुळे या बस देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.
-चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक