पुणे – सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष स्वागतासाठी दरवर्षी महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कनसह वेगवेगळ्या भागांत होणारी गर्दी विचारात घेऊन शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी 5 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी दिली.
यंदा नववर्ष स्वागतावर करोनाचे सावट आहे. रात्री 11 ते सायंकाळी 6 यावेळेत शहरात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी केले. नववर्ष स्वागतासाठी उपहारगृहे, मद्यालयात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती. यंदा रात्री अकरापूर्वीच उपहारगृहे आणि मद्यालये बंद करण्याच्या सूचना आहेत.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी बॉंब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस), साध्या वेशातील पोलिसांचे पथक तैनात राहणार आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी तसेच मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यंदा नववर्ष स्वागतावर करोनाचे सावट आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. शक्यतो यंदा घरातच नववर्ष साजरे करावे. हुल्लडबाजी केल्यास कारवाई करण्यात येईल.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त