पिंपरी, (प्रतिनिधी) – सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड येथील विभागीय कार्यालयात दरवर्षी अनेक मान्यवर गणेशाच्या दर्शनासाठी उपस्थिती दाखवत असतात.
यंदाही अनेक मान्यवरांनी दैनिक प्रभातच्या श्रीगणेशाचे दर्शन घेऊन आराधना केली. रविवारी (दि.१५) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्य पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे दैनिक प्रभातच्या श्रीगणेशाच्या आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी विनयकुमार चौबे यांनी दैनिक प्रभातसोबत संवाद साधला.
पिंपरी-चिंचवड सारख्या महाविस्तीर्ण शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिसांकडून दिवसरात्र परिश्रम घेतले जातात. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्वधर्मीय नागरिकांचे वास्तव्य आहे.
तसेच सर्वच धर्मीय नागरिक त्यांचे सण समारंभ एकत्रितपणे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करत असतात. त्यामुळे याकाळात कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता राखणे आणि निर्विघ्नपणे सण समारंभ पार पाडण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते.
याअनुषंगाने आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी चोख नियोजन केल्याचे दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणूक आता तोंडावर आली आहे. उत्सवाचे अवघे दोन दिवस बाकी असून संपूर्ण गणेशोत्सव जसा शांततेत पार पडला तसाच विसर्जन मिरवणुकीचा सोहळा देखील निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
विसर्जन काळात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांसह एकूण ५००० पोलीस कर्मचारी तैणात केले जाणार असल्याची महत्वाची माहिती आयुक्त चौबे यांनी दिली. यासह अनेक सामाजिक संस्थाचेही स्वयंसेवकांचे सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गणरायाला साकडे
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर आहे. या शहरातील उद्योग जोमात चालावेत, उद्योगांची संख्या वाढावी, पर्यायाने रोजगारही वाढतील. तसेच सर्व पिंपरी-चिंचवडकरांना सुख-समृद्धी मिळावी, असे साकडे गणरायाला घातले असल्याचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे –
सध्या सुरू असलेला गणेशोत्सव, तसे आगामी सर्व सण समारंभ, इतर धर्मीयांचे सण समारंभ या सर्व काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे,
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दैनिक प्रभातच्या माध्यमातून नागरिकांना केले. कोणालाही त्रास होईल, असे वर्तन करु नये.
यासह समाजकंटकांकडून त्रास होत असल्यास तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, पोलीस सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, असे देखील आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.