पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी मतपेट्या (इव्हीएम मशीन) वाहून नेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसटी आणि पीएमपीकडून बस घेतल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर मतपेट्या वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (एसटी) ५०० बसची मागणी करण्यात आली आहे.
त्यानुसार पुणे एसटी विभागातून बस पुरविण्याचे नियोजन सुरू केले आहे, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी मतपेट्या वाहून नेण्यासाठी एसटी आणि पीएमपी बस पुरविल्या जातात. त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार एसटीकडे किती बस लागतील, याची माहिती देतात.
त्यानुसार एसटीकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी बस पुरविल्या जातात. यावेळी विधानसभेचे मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, भोर-वेल्हा-मुळशी, मावळ, आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरुर व इतर मतदारसंघात एसटीकडून बस पुरविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या बसची देखभाल दुरुस्ती, नियोजन करण्यास एसटीकडून सुरुवात करण्यात आली आहे.
दोन दिवसांसाठी बस…
एसटीकडून मतदानाच्या आदल्या दिवशी सकाळपासून मतपेट्या नेण्यासाठी एसटी बस संबंधित मुख्य केंद्रावर जातील. त्या ठिकाणाहून मतपेट्या घेऊन बस दिलेल्या केंद्रावर पोहोचवतील. एका बसमध्ये चार ते पाच मतदान केंद्राच्या पेट्या असतील. त्या पेट्या पोहचून आल्यानंतर बस पुन्हा मार्गावर जातील.
त्यानंतर दुसर्या दिवशी मतदान संपायच्या अगोदर एक तास पुन्हा या बस मतपेट्या घेऊन दिलेल्या केंद्रावर जातील. एखादी बस बंद पडली तर त्यासाठी राखीव बस देखील ठेवण्यात येणार आहेत.