जिल्हाधिकारी राम : ग्रामीण भागात वाढती रुग्णसंख्या चिंताजनक
पुणे – शहरालगत आणि ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण वाढणे ही चिंतेची बाब आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 500 बेड तयार ठेवले जाणार आहेत. त्या ठिकाणी खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जात आहे. आतापर्यंत 106 एमबीबीएस डॉक्टरांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरालगतच्या गावांमध्ये करोना रुग्ण आढळून येत होते; परंतु आता जिल्ह्यातील इतर भागातही रुग्ण आढळत आहेत. त्यांना तालुक्याच्या ठिकाणीच उपचार उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी आवश्यक बेड तयार केले जात आहेत. एखाद्या कंपनीत रुग्ण सापडल्यास संपूर्ण कंपनी बंद करणे योग्य होणार नाही. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जात आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळतील, ती कंपनी बंद केली जाईल, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.
…तरी करोना मृत्यू नोंद
ससून रुग्णालयात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर लगेच मृत्यू झालेल्या रुग्णांची करोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे करोना मृत्यू नोंद केली जाते, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या तीन ते चार दिवसांत येईल, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.