वीर धरणातून 50 हजार क्‍युसेकने विसर्ग

वीर मार्गे लोणंदला जोडणारा पूल बंद

परिंचे – परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी (दि. 22) पहाटे वीर धरणातून नीरा नदीपात्रात 50 हजार 400 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पाणी कमी करून 32 हजार क्‍युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला. त्यामुळे वीर मार्गे लोणंद (जि. सातारा) जोडणारा पूल बंद करण्यात आला होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता आणखी विसर्ग वाढण्याची शक्‍यता असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी पहाटे पाच वाजता धरणाचे सात दरवाजे चार फुटांनी उचलून नदीपात्रात 50 हजार 400 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. वीर धरण शंभर टक्‍के भरले असून, धरणात 9.295 टीएमसी येवढा पाणीसाठा आहे. धरणातील नीरा उजव्या कालव्यातून 900 तर डावा कालव्याद्वारे 400 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातील अनेक नद्यांचे पाणी नीरा नदीपात्रात येत आहे. भाटघर धरणातून सहा हजार क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. गुंजवणी व नीरा देवघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, शिवगंगा व कानंदी नदीमधून मोठ्या प्रमाणात नीरा नदीपात्रात पाणी येत आहे.

पुरंदर खोऱ्यातील कर्पुरगंगा व रुद्रगंगा नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात नीरा नदीपात्रात येत आहे. पहाटे धरणाचे सात दरवाजे चार फुटांनी उचलून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे पुणे जिल्ह्यातून वीर मार्गे सातारा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.