जम्मू-काश्‍मीरमध्ये 6 महिन्यांत 50 जवानांना वीरमरण

नवी दिल्ली -जम्मू-काश्‍मीरमध्ये चालू वर्षी मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांत सुरक्षा दलांनी 138 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या कालावधीत दहशतवादी कारवायांत आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या माऱ्यात 50 जवानांना वीरमरण आले.

संबंधित माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. सीमेपलिकडून पाठिंबा मिळणाऱ्या दहशतवादाच्या समस्येने जम्मू-काश्‍मीरला तीन दशकांपासून अधिक काळापासून ग्रासले आहे. मात्र, दहशतवाद बिल्कूल खपवून न घेण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे.

सुरक्षा दले दहशतवादाविरोधात सातत्याने आणि प्रभावीपणे पाऊले उचलत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षीच्या ऑगस्टपासून ते जुलै 2020 पर्यंत सीमेपलिकडून घुसखोरीचे 176 प्रयत्न झाल्याची माहितीही रेड्डी यांनी दिली.

करोनाबाधेने 100 निमलष्करी जवानांचा मृत्यू
करोनाबाधेमुळे देशात आतापर्यंत निमलष्करी दलांचे 100 जवान मरण पावले. त्यामध्ये सीआरपीएफच्या जवानांची संख्या सर्वांधिक 35 इतकी आहे. करोना संसर्गामुळे दगावलेल्यांमध्ये सीआयएसएफच्या 24 तर बीएसएफच्या 23 जवानांचा समावेश आहे, अशी माहिती आणखी एक गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत स्वतंत्रपणे दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.