पुणे -करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता खासगी रुग्णालयांतील 50 टक्के बेड महापालिका ताब्यातच ठेवणार आहे. त्यामुळे करोनाच्या संभाव्य स्थितीत रुग्णांवर त्वरित उपचार सुरू करता येणार आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये करोना संसर्ग कमी झाला होता. मात्र, फेब्रुवारी-मार्चमध्ये करोनाने डोके वर काढले आणि वेगाने दुसरी लाट आली. पहिल्या लाटेपेपेक्षा बाधितांची संख्या, सक्रीय बाधित, गंभीर रुग्ण, ऑक्सिजन लागणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे बेडची उपलब्धता करताना महापालिकेच्या अक्षरश: नाकीनऊ आले.
यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांतील सुमारे 80 टक्के बेड करोना बाधितांसाठी नियंत्रणाखाली आणले. त्यामुळेच सुमारे 10 ते 11 हजार बेडची व्यवस्था झाली. यात दोन जम्बो कोविड, महापालिकेची आणि खासगी रुग्णालये आणि त्यामधील साध्यापासून ते व्हेंटिलेटर बेडचा समावेश होता.
आता मेच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनमध्ये खासगी रुग्णालयांतील ताब्यात घेतलेल्या बेडपैकी 40 टक्के बेड पुन्हा त्यांच्या ताब्यात दिले.
मात्र, ते करताना पुन्हा एकदा आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास ताब्यात घेऊ शकतो अशी अट ठेवण्यात आल्याचे महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले.