नवी दिल्ली – देशातील 50 दशलक्ष नागरिकांना परिणामकारकपणे हात धुण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे करोना विषाणूसारख्या घातक आजारांचा फैलाव होण्याचा मोठा धोका आहे, असे एका अभ्यासात म्हटले आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील हेल्थ मेट्रिक्स ऍन्ड इव्हॅल्युएशन इन्स्टिट्युट (आयएचएमई) च्या संशोधकांनी याबाबतचे निरीक्षण मांडले आहे.
साबण आणि स्वच्छ पाणी उपलब्ध नसणे ही जगभरातील 2 अब्ज मध्यम आणि निम्नवर्गातील नागरिकांची समस्या आहे. ही लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश इतकी आहे. याच वर्गाकडून श्रीमंत देशांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता असते. यापैकी उप-सहारा आफ्रिका आणि ओशनियातील निम्मे लोकांकडे हात धुण्याची पुरेशी सुविधा नाही, असे निरीक्षण “एन्व्हायरमेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्ह’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. “आयएचएमई’चे प्राध्यापक मायकेल ब्रुअर यांनी हे निरीक्षण मांडले आहे.
जगभरातील 46 देशांमधील निम्म्या लोकांना हात धुण्यासाठी पाणी आणि साबण यासारखी प्राथमिक सुविधाही नाही. यात भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नायजेरिया, इथिओपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि इंडोनेशियामध्ये अंदाजे 50 दशलक्ष लोकांचा समावेश आहे. सॅनिटायझर उपलब्ध होणे ही तात्पुरती व्यवस्था आहे. मात्र कायमस्वरुपी उपाय योजना उपलब्ध नाही. व्यवस्थित हात न धुतल्यामुळेच दरवर्षी 7 लाख मृत्यू होतात, असे प्रा. ब्रुअर यांनी या निरीक्षणात म्हटले आहे.
जगातील लोकसंख्येच्या 25 टक्के लोकांकडे हाताने धुण्याची प्रभावी सुविधा उपलब्ध नसतानाही 1990 ते 2019 दरम्यान बऱ्याच देशांमध्ये भरीव सुधारणा झाली आहे. त्या देशांमध्ये सौदी अरेबिया, मोरोक्को, नेपाळ आणि टांझानिया या देशांचा समावेश आहे. या देशांच्या स्वच्छतेत सुधारणा झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.