जिल्ह्यात होणार 50 लाख वृक्षांची लागवड

राज्य सरकारने दिले जिल्हा परिषदेला उद्दिष्ट : खड्डे खोदण्याचे काम अंतिम टप्प्यात

पुणे – अवघ्या काही दिवसांवर पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने यावर्षीही 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुणे जिल्हा परिषदेला जवळपास 50 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्‍यक खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. आजपर्यंत 48 लाख खड्डे खोदण्यात आले आहे. यावर्षी ग्रामपंचायत विभागासह शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम आणि महिला व बाकल्याण विभागाकडेही जबाबदारी देण्यात आली आहे.

गतवर्षी जिल्हा परिषदेने 6 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असतानाही तब्बल साडेसहा लाख वृक्षलागवड केली. तर यावर्षी ग्रामपंचायत विभागाला तब्बल 44 लाख 78 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचबरोबर यावर्षी पहिल्यांदा जिल्हा परिषदेतील अन्य विभागांनाही 4 लाख 10 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाडी, पाझर तलाव आणि ग्रामीण भागातील रस्ते याठिकाणी वृक्षरोपण करण्यात येणार आहे.

त्यासाठी ग्रामपंचायत आणि अन्य विभागाकडून आवश्‍यक खड्डे खोदण्यात आले असून पावसाळा सुरू होताच वृक्षारोपणाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात एकूण 1 हजार 399 ग्रामपंचायतींची संख्या असून या परिसरात 44 लाख 78 हजार 200 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत उद्दिष्टपेक्षाही अधिक 44 लाख 80 हजार 725 खड्डे खोदण्यात आले आहे. शिक्षण विभागाला 1 लाख 27 हजार 80 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून शाळेच्या परिसरात हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाला 2 हजार 825 आणि पशुसंवर्धन विभागाला 1 हजार 855 उद्दिष्ट असून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात वृक्षारोपण करणार आहेत. बांधकाम विभागाला 2 लाख 20 हजार 755 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. छोटे पाटबंधारे विभागाला 41 हजार 770, महिला व बालकल्याण विभागाला 15 हजार 110 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून अंगणवाडी परिसरात हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

वृक्षलागवडीमध्ये सर्व विभागांचा समावेश असवा यासाठी पहिल्यांदा ग्रामपंचायतीसह अन्य सहा विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातील वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारीही तेथील कर्मचारी आणि नागरिकांची आहे. त्यामुळे लागवडीनंतर वृक्ष जगण्याचे प्रमाणही अधिक राहील.
– प्रभाकर गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.