जमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक

राजगुरूनगर- गोव्यातील जमिन खरेदी व्यवहारात राजगुरूनगर मधील तीन युवकांची ५० लाखाची फसवणूक झाली असून याप्रकरणी गोव्यातील रामदास मधुकर वेद्रे सध्या रा चव्हाण मळा राजगुरूनगर, गुनुलू रामनाथ परब, स्वप्नील शशिकांत बेलवनकर रा कोटबी ता बिचोलीन उत्तर गोवा या तीन जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामदास मधुकर वेद्रे सध्या रा चव्हाण मळा राजगुरूनगर, मुळगाव कोटंबी उत्तर गोवा याने राजगुरूनगर मधील मनोज धोंडिबा चव्हाण, गणेश शंकर टाकळकर, बापूसाहेब महादेव बोंबले यांच्याशी ओळख करून गोव्यात जमीन विक्रीला आहे असे सांगितले. गुनुलू रामनाथ परब यांच्या मालकीची गोव्यातील सर्व्ह न ४०/३ क्षेत्र ५२२५ क्वेअर मीटर जमीन खरेदी करण्याचे ठरले.त्यानुसार जमिनीचा व्यवहार जून २०१६ पूर्वी ठरवून त्यानंतर ९ नोव्हेंबर २०१८ पूर्वी तक्रार दारांनी वेळोवेळी ५० लाख रुपये चेक, आरटीजीएस व रोख स्वरूपात दिलेले आहेत. पूर्ण व्यवहार दीड कोटी रुपयांचा ठरलेला होता. त्यापैकी इसार रक्कम ५० लाख रुपये जमीन मालक गुनुलू रामनाथ परब याना देण्याचे ठरले होते.

५० लाख रुपये दिल्यानंतर रीतसर इसार पावती करण्यास परब याने टाळाटाळ केली खरेदीदार हे रामदास मधुकर वेद्रे, स्वप्नील शशिकांत बेलवनकर या मध्यस्थीना घेऊन गोव्यात गेले. त्यावेळी जमिनीचा मूळ मालक असलेला गुनुलू रामनाथ परब हा घरदार विकून तेथून पसार झाल्याचे निदर्शनास आले. यावरून आपली ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने राजगुरूनगर मधील वरील तीन युवकांनी खेड पोलीस ठाण्यात फियाद दिली. त्यानुसार खेड पोलिसांनी वरील तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.