50 कोटी वृक्षलागवडीची होणार चौकशी

वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आदेश ः दोन महिन्यांत अहवाल मिळण्याची शक्‍यता
मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अर्थमंत्री तसेच वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वनीकरणासाठी राबविलेली 50 कोटी वृक्ष लागवड चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. हे वनीकरण म्हणजे फसवे आणि कागदोपत्री असल्याचा आरोप करत कॉंग्रेस नेते व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीच्या आधारे वनमंत्री संजय राठोड यांनी गेल्या 5 वर्षांत झालेल्या वृक्षलागवडीची चौकशी करण्याचे आदेश वनविभागाचे प्रधान सचिवांना दिले आहेत.

प्रत्यक्षात किती झाडे लावली आणि किती जगली याची चौकशी करून येत्या दोन महिन्यांत याचा अहवाल मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
2014 मध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली होती. राज्य सरकार तसेच स्वयंसेवीसंस्था तसेच व्यक्‍तीगत पातळीवरही अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

त्याची सुरवात 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी दोन कोटी झाडे लावण्याच्या कार्यक्रमाने केली. त्यानंतर 2017 मध्ये 4 कोटी, 2018मध्ये 13 कोटी व 2019 मध्ये 33 कोटी अशी 50 कोटी झाडे लावण्याचा अधिकृत कार्यक्रम घेतला. अशा प्रकारे 50 कोटी पेक्षा अधिक वृक्ष लागवड केल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर केली. या वृक्षलागवडीचे “लिम्का बुक’मध्येही नोंद झाली होती. या वृक्ष लागवडीवर सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या वृक्ष लागवडीमुळे राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक भार येईल याचा विचार केला नाही, असा आक्षेप काही लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीनंतर घेतला होता. संजय राठोड म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकारही 50 कोटी झाडे लावणार आहे. जुलै महिन्यापासून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. पण मागील सरकारच्या काळात 50 कोटी झाडे लावली त्या संदर्भात लोक प्रतिनिधींच्या मनात शंका आहेत. काही लोकांना वाटते की, झाडे जगली नाहीत, काही लोकप्रतिनिधींना वाटते की झाडे लावलीच नाहीत.

फक्त फुगवून आकडे दिले अशीही काहींना शंका आहे. त्यामुळे या संदर्भात या सर्वाची चौकशी झाली पाहिजे ही भूमिका होती. त्या अनुशंघाने चौकशीचे आदेश दिले आहेत. वृक्ष लागवडीत सत्यता असेल तर काही होणार नाही, पण दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल असे ते म्हणाले.

निवृत्त न्यायधिशामार्फत चौकशी करा! – मुनगंटीवार
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वृक्षलागवडीच्या चौकशीच्या आदेशाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांना पत्र पाठवले आहे. हा कार्यक्रम एकट्या वनविभागाचा नव्हता, अनेक शासकीय विभागांनी वृक्ष लागवडीत सहभाग घेतला आहे. या पर्यावरणीय, ईश्‍वरीय कार्याबाबत शंका घेणे योग्य नाही.

शंकेखोराच्या मनातील शंका दूर होणे अत्यंत आवश्‍यक आहे. ही चौकशी एकट्या वन सचिवांच्या माध्यमातुन होणे हे कठीण आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातुन या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे. हा विषय राजकारणाचा होवू नये, या विषयामध्ये राज्याच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होवू नये, यासाठी आपण श्‍वेतपत्रिका काढून प्रत्येक विभागाने यासंदर्भात केलेले कार्य, नागपूरमध्ये कमांड रूममधील व्हिडीओ क्‍लीप्स क्‍यु. आर. कोडच्या माध्यमातुन आपणास उपलब्ध होतील, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.