20 पादचारी, 30 दुचाकीस्वारांचा समावेश ः मृतांमध्ये सर्वाधिक तरुण
पुणे – शहरात मागील चार महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये 20 पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. तर दुचाकीच्या अपघातांमध्ये 30 चालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये 25 ते 35 वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण जास्त असल्याचेही पोलीस यंत्रणेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.पोलिसांनी विविध उपाययोजना तसेच हेल्मेट सक्तीची कारवाई करुनही अपघातांच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गंभीर स्वरुपाच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. तर प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्यांच्या कालावधीत शहरात 20 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, दुचाकींच्या झालेल्या अपघातांमध्ये 30 दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुचाकींवर सहप्रवासी असलेल्या 8 जणांना जीव गमवावा लागला आहे.
सुसूत्रीकरणाचे काम सुरू रस्ते अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगत सर्वोच्च कोर्टाकडून यावर उपाययोजना करण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने राज्य शासनाला अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे काम करत आहेत. याचाच एक भाग म्हणून वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बगडा उगारला आहे. डिव्हायडर, ब्लॅक स्पॉट दुरुस्ती, सिग्नलचे सुसूत्रीकरण केले जात आहे.