श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात झालेल्या दोन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेचा वचपा सुरक्षा दलांनी दुसऱ्याच दिवशी काढल्याचे मानले जात आहे.
शोपियॉंमधील दोन गावांमध्ये दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी सायंकाळपासून दोन मोहिमा हाती घेतल्या. त्या मोहिमांवेळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्याने दोन्ही गावांमध्ये चकमकी सुरू झाल्या.
रात्री सुरक्षा दलांनी मोहिमांना तात्पुरती स्थगिती दिल्याने काही तासांपुरत्या चकमकी थांबल्या. मात्र, मंगळवारी पहाटेपासून पुन्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. त्यानंतर एका चकमकीत तीन, तर दुसऱ्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.
त्यातील एक दहशतवादी काही दिवसांपूर्वी झालेल्या परप्रांतीयाच्या हत्येत सामील असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, जम्मूत एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. इरफान अहमद बट असे त्याचे नाव आहे. तो लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता.