दरड कोसळल्यामुळे 5 रस्ते बंद

पुणे – शहरासह जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, भोर आणि शहर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे 5 मार्ग बंद करण्यात आले. त्यामध्ये पुरंदर आणि हवेली तालुक्‍यातील प्रत्येकी 2 तर भोर तालुक्‍यातील 1 मार्गाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागांतील गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून वाहन नेताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मध्येच वाहने बंद पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. दरम्यान, पावसामुळे नवीन कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे तब्बल 4 ते 5 तास पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग बंद होता. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. त्यावेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदतकार्य सुरू करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पुरंदर तालुक्‍यातून जाणारा सासवड-जेजुरी मार्ग पोलिसांना बंद करावा लागला. तसेच, भोर तालुक्‍यातील एक मार्ग रात्री वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर सकाळी सर्व परिस्थिती आटोक्‍यात आल्यावर तो सुरू करण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रात्री आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडा. पाणी जास्त असल्यास त्याठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)