Maharashtra Assembly Election 2024 – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ६६.०५ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा (वर्ष २०१९) यावेळी ५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. मागील वेळी ६१.१ टक्के मतदान झाले होते.
यावेळच्या निवडणुकीसाठी राज्यभरात बुधवारी मतदान झाले. त्या मतदानाच्या टक्केवारीची माहिती निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी गुरूवारी दिली.
त्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इव्हीएम) माध्यमातून ६६ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. संबंधित आकडेवारीत टपाली मतदानाचा समावेश करण्यात आलेला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांधिक ७६.६३ टक्के, तर त्याखालोखाल गडचिरोलीत ७५.२६ टक्के मतदान झाले. मुंबई शहरात सर्वांत कमी ५२.०७ टक्के मतदानाची नोंद झाली.
मागील वेळेच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याचा फायदा कुणाला होणार आणि कुणाला फटका बसणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्या प्रश्नाचे उत्तर मतमोजणी म्हणजेच निकालातून मिळेल. ती मतमोजणी शनिवारी होईल. राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या गेलेल्या विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.