नगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी आज 14 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते करोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, आज आणखी 5 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. तसेच, आज 5 जणांना जिल्हा रुग्णालय येथे तर 2 जणांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
करोना विषाणू संसर्गासंदर्भात पुण्याहून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की, जे सध्या 14 जणांचे नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी,दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, ज्या नागरिकांना घरीच वेगळे देररेखीखाली ठेवले जाणार आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, तसेच इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे न केल्यास संबंधित नागरिकांना जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्याठिकाणी या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, त्याठिकाणी जिल्हा प्रशासना आणि आरोग्य विभागा -च्यावतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा,असे ते म्हणाले.यापूर्वीच महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील सर्व शाळा,महाविद्यालये, आयटीआय, तंत्र प्रशाला,निवासी वसतीगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.याशिवाय,कोणतेही खासगी क्लासेसही या काळात सुरु राहणार नाहीत.
तसे करणाऱ्यावर कार्यवाही केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. या काळात शहर व जिल्ह्यातील दुकानेही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्याची सूचना त्यांनी केली.तसेच शहरात आज सर्वत्रच शुकशुकाट पसरला असल्याने मंगळवार बाजाराकडे ही नागरिकांनी पाठ फिरवली.