मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात बिहारचे पोलिस धन्यता मानत होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात क्राईम असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्याच सुशांत सिंहच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर भर चौकात गोळ्या घातल्याची घटना समोर आली.
सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे. बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूरा या तीन जिल्ह्यात त्याचं यामाहा मोटारसायकल शोरुम्स आहेत. ते दररोज मधेपूरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असायचे. नेहमीप्रमाणे ते मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली.
दरम्यान, यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांना मारण्यासाठी तब्बल 5 लाखांची सुपारी दिली होती. जमिनीवरून झालेल्या वादावरून ही घटना घडली. यामाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंहचा छोटा भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक उमेश दालान यांच्यात पूर्वीपासूनच जमिनीवरून वाद सुरू आहेत. याच कारणावरून उमेश दालानने विकी चौबे नावाच्या एका व्यक्तीला भावाला मारण्याची 5 लाखांची सुपारी दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी एसआयटी टीम गठीत केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता आरोपींबद्दलची माहिती मिळाली. फोन लोकेशनवरून आरोपींच्या पत्ता लागला.