चंदिगढ – हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात कुस्तीच्या दंगलीत झालेल्या गोळीबारात पाच जण मरण पावले. तर एका लहान मुलासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. एका खासगी महाविद्यालयाशेजारी असणाऱ्या आखाड्यात या कुस्त्या होत होत्या.
दोन प्रशिक्षकांत असणाऱ्या पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या गोळीबारात सुरवातीला तीन जण मरण पावल्याचे पोलिस अधिक्षक राहूल शर्मा यांनी सांगितले. त्यानंतर मृतांची संख्या वाढून पाचवर पोहोचली.
पोलिसांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवले आहेत. मृतांची ओळख पटली असून सोनिपत येथील रहिवासी मनोज कुमार, त्यांची पत्नी साक्षी, कुस्तीपटू पूजा आणि कुस्ती प्रशिक्षक सतिश कुमार आणि प्रदीप मलिक यांचा त्यात समावेश आहे. पोलिस आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ या घटनेचा तपास करत आहेत.