लखनौ : उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये शनिवारी तीन मजली इमारत कोसळली. त्या दुर्घटनेत 5 जण मृत्युमुखी पडले, तर 24 जण जखमी झाले. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लखनौच्या ट्रान्सपोर्टनगरमध्ये गोडाऊन म्हणून वापरली जाणारी इमारत सायंकाळच्या सुमारास अचानकपणे कोसळली. ती इमारत सुमारे ४ वर्षांपूर्वी बांधण्यात आली. सध्या त्या इमारतीमध्ये नव्याने काही बांधकाम सुरू होते. इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांची पथके सहभागी झाली.
ढिगाऱ्याखालून काही जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेची दखल घेऊन स्थानिक प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली. ते बचाव कार्यावर देखरेख ठेऊन आहेत.