Share Market Crash Reasons: भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसात शेअर बाजाराचे इंडेक्स 3 टक्क्यांनी कोसळले आहेत. अवघ्या 5 दिवसातच गुंतवणूकदारांना तब्बल 16.97 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील सुचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य कमी होऊन 408 लाख कोटी रुपये आले आहे. मंगळवारी (11 फेब्रुवारी) एकाच दिवसात सेन्सेक्स 1,018 अंकांनी म्हणजे 1.32% कोसळला आहे. NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 309.80 अंकांनी किंवा 1.32 टक्क्यांनी घसरला आणि 23,071.80 च्या पातळीवर बंद झाला. भारतीय बाजारात एवढी घसरण होण्याची नेमकी कारणे काय आहेत, ती समजून घेऊयात.
या 5 कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण
- ट्रम्प सत्तेत आल्यापासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. अमेरिकने अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगात नवीन व्यापार युद्धाची भीती निर्माण झाला आहे. यामुळे महागाई वाढण्याचीही शक्यता आहे. याचाच परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.
- गेल्याकाही दिवसात भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत चालला आहे, ज्याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केल्याने भारतीय बाजारावरही नकारात्मक परिणाम झाला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकन बाजाराकडे आकर्षित होत आहेत.
- मागील काही महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढली आहे. परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत आहे. यूएस बॉंड यिल्ड्स आणि मजबूत डॉलरमुळे गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून घेत आहेत. साल 2025 मध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 88,139 कोटी रुपये मूलभूत इक्विटीची विक्री केली आहे.
- काही मोठ्या कंपन्यांचे तिमाहीतील निकालही फारसे चांगले राहिले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून शेअर्सची धडाधड विक्री केली जात आहे. RIL, Asian Paints, TCS आणि HDFC सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. त्यामुळे बाजारावर दबाव वाढला.
- मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील व्हॅल्यूएशनबाबत तज्ञांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अवास्तव वाढ झाल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे. अनेक तज्ञ स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत.