पुणे – शहरात करोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत आणखीन 5 जणांचा मृत्यू झाला असून, किमान शहरातील हा मृत्यूचा कहर पाहून तरी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आजारी असल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. आपल्यामुळे आपले कुटुंब, परिसर आणि शहराला बाधा पोहोचू नये या जाणीवेतून नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, शहरात नवे 55 बाधित आढळले आहेत.
ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वयवर्षे 34, 38, 63 आणि 73 वयोगांटील चार पुरुषांचा बुधवारी (दि.15) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 41 वर जावून पोहोचली आहे. शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या 34 वर्षीय व्यक्तीला मंगळवारी (दि.14) श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना लठ्ठपणाचा त्रास होता. त्यामुळे त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.
पर्वती गाव येथे राहात असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीला 10 एप्रिलला रुग्णालयात दाखल केले. त्यांना मायोकॅडिटीस वेन्ट्रीक्युलर टॅचकार्डिया हा आजार होता. त्यामुळे मंगळवारी (दि. 14) रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच गोखलेनगर परिसरातील 63 वर्षीय आणि भवानी पेठेतील 73 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांना 13 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यातील 73 वर्षीय व्यक्तीचा किडनीचा त्रास होता तर, दुसऱ्या व्यक्तीला मायोकॅडिटीसचा त्रास होता. पर्वती येथील एका 55 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल केले होते.