शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथे शिरूर तालुक्यातील सर्व प्रथम रुग्ण आढळून आल्यानंतर सणसवाडी प्रशासनाला गावामध्ये कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी यश आलेले असताना आता चार महिन्यांनी पुन्हा सणसवाडीमध्ये दोन रुग्ण आढळून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील सणसवाडीतील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार व इतर एक अशा 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सणसवाडी येथे २४ मार्च रोजी शिरूर तालुक्यातील प्रथम कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यावेळी संपूर्ण तालुका प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून कोरोना आटोक्यात आणला होता. त्यांनतर अद्याप सणसवाडी मध्ये एकहि कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता.
मात्र, सणसवाडी येथील एका स्थानिक युवकाला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खबरदारी म्हणून स्वतः तपासणी केली असताना त्याचा कोरोना अहवाल ७ जुलै रोजी पॉझिटिव्ह येत त्याच्या संपर्कातील एका व्यक्तीचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील दहा जणांचे स्व्याब तपासणीसाठी घेतले असता त्यापैकी त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे, तर सणसवाडी येथीलच एक महिला तिच्या औषधोपचारासाठी वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये जात असताना तेथील डॉक्टरांनी त्या महिलेची कोरोना तपासणी केली असता त्या महिलेचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे आज सणसवाडी येथे पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून त्या पाच जणांपैकी चारजण एकाच कुटुंबातील असून प्रथम कोरोना बाधित आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील चारजण आहेत, तर एक गावातील महिला देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तर एकाच दिवशी पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणच्या परीसरासह संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली असल्याचे सरपंच रमेश सातपुते यांनी सांगितले आहे. तर गावामध्ये प्रथम आढळून आलेला कोरोना बाधित युवकासोबत अनेक युवकांचा संपर्क येत होता, त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.