मुंबई – भारताच्या दृष्टिकोनातून जागतिक परिस्थिती नकारात्मक झाली असताना कंपन्या कमी नफ्याचे ताळेबंद जाहीर करत आहेत. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच आता देशातील किरकोळ गुंतवणूकदार विक्री करू लागले आहेत. यामुळे मंगळवारी शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने कमी झाले. परिणामी एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 5.29 लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 820 अंकांनी कोसळून 78,675 अंकावर बंद झाला. एक महिन्यापूर्वी हा निर्देशांक 86,000 अंकावर गेला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.19 टक्क्यांनी म्हणजे 257 अंकांनी कोसळून 23,883 अंकावर बंद झाला.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार ज्या प्रमाणात विक्री करीत आहेत त्या प्रमाणात देशातील संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. मात्र किरकोळ गुंतवणूकदारांनी विक्री वाढविल्यामुळे गेल्या 3 दिवसापासून निर्देशांक कमी पातळीवर बंद होत आहेत. ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे भारतीय शेअर बाजारासह इतर अनेक क्षेत्रावर परिणाम होत आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 2,306 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 2,026 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. बाजार बंद झाल्यानंतर किरकोळ महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार होती. ती नकारात्मक असेल असे गुंतवणूकदारांना वाटले. बाजार बंद झाल्यानंतर खरोखरच ही आकडेवारी नकारात्मक निघाली. अमेरिका वगळता इतर कोणत्याही देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक फारसे वाढले नाहीत.
स्टेट बँक, एनटीपीसीला फटका –
एनटीपीसी, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, पावर ग्रीड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. सन फार्मा, इन्फोसिस आयसीआयसीआय बँकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. ऊर्जा, भांडवली वस्तू, वाहन धातू क्षेत्राचे निर्देशांक 2.80% पर्यंत कोसळले. बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक मात्र वाढले. जर रिझर्व बँक आणि सरकारने काही प्रयत्न केले नाहीत तर याचा विकासदरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे समजले जाऊ लागले आहे.