49 वर्षांपूर्वी प्रभात : कसे वागावे ते आम्ही पाकिस्तानला शिकवू!

ना. जगजीवनराम यांचे आश्‍वासन
नवी दिल्ली, ता. 9 – गेल्या डिसेंबरमधील भारत-पाक युद्धानंतर अस्तित्वात आलेल्या युद्ध तहकुबी रेषेचे संरक्षण करण्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन आज संसदेच्या सभागृहात संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी दिले. जम्मू-काश्‍मीरमधील टिटवाल भागात पाकिस्तानचा जो मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला, त्याबाबत आलेल्या लक्षवेधी सूचनेला जगजीवनराम उत्तर देत होते.

ते म्हणाले, “कसे वागावे हे जर पाकिस्तानला कळत नसेल, तर आम्ही शिकवू! पाकिस्तान जय्यत तयारीत असेल, पण आम्हीही तयारी करीत आहोत. उपखंड्यात शांतता राहील अशी भारताची खात्री झाल्याशिवाय आम्ही आमच्या सैन्याला विश्रांती देणार नाही. स्थानिक सैनाधिकाऱ्यांची बैठक होईल व पूर्वीचीच ताबा-रेषा पुन्हा प्रस्थापित केली जाईल.

पत्रकारांनी लोकांसाठी लढणे हा पंचमहाभुतांवर रामबाण उपाय
पुणे – भांडवलदार, सरकार, जाहिरातदार, लोकनेते आणि सुप्रीम कोर्ट ही पत्रकारांना पछाडणारी पंचमहाभुते आहेत आणि ती अमर आहेत, म्हणून पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्राची लोकप्रियता वाढविली पाहिजे. लोकांसाठी लढले पाहिजे, लोकांमध्ये प्रेम व ओलावा निर्माण केला पाहिजे. हाच यावर रामबाण, खात्रीलायक उपाय ठरू शकेल’, असे उद्‌गार नीलकंठ खाडिलकर यांनी वसंत व्याख्यानमालेतील 19वे पुष्प गुंफताना काढले.

विनोदामुळे जीवन सुसह्य होते
वाई – विनोद ही एक सहज प्रवृत्ती आहे आणि जीवनात त्याची अत्यंत आवश्‍यकता आहे. जे लोक जीवनाकडे विशाल दृष्टीने पाहू शकतात आणि ज्यांच्यामध्ये खिलाडूवृत्ती आहे तेच लोक विनोद करू शकतात. जेथे व्यक्‍तिस्वातंत्र्य आहे तेथेच विनोदाचा आविष्कार होतो, असे मत प्रा. जी. बी. जोशी यांनी व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.