49 वर्षांपूर्वी प्रभात | ता. 14, माहे मे, सन 1972

विकासासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण जरूर

पुणे, ता. 13 – भारतातील सर्व राज्यांतील सरासरी उत्पन्नाचा विचार करता महाराष्ट्राचे सरासरी उत्पन्न सर्वात जास्त आहे, हे खरे असले तरी “मुंबई’ वगळता बाकीच्या महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न उत्यंत कमी आहे. मुंबई वगळता महाराष्ट्र अविकसित, मागासलेला आहे. म्हणजेच मुंबईतील मूठभर प्रस्थापित हितसंबंधी मंडळींनी संबंध महाराष्ट्राची संपत्ती बकासुराप्रमाणे गिळंकृत केली आहे.

तेव्हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्‍यक आहे, तीच नियोजनाची दिशा असली पाहिजे’, असे उद्‌गार ब्लिटसचे संपादक विनायक भावे यांनी काढले. पाणी, वीज व इतर सर्व वस्तूंचा ओघ संबंध महाराष्ट्रातून मुंबईकडेच वाहतो. “आर्थिक नियोजन’ म्हणजे नियंत्रण आलेच, याकडे शासनाने डोळेझाक करून चालणार नाही. अन्यथा या दारिद्य्राच्या दशावतारांच्या दशमुखी रावण निर्माण होईल.

रेल्वे इंजिनासाठी खास काच
लंडन – रेल्वे इंजिनाच्या पुढल्या बाजूस विंडस्क्रिनवर बसविण्यासाठी ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलेल्या एका खास प्रकारच्या काचेचा आता ब्रिटिश रेल्वे व अन्य देशातील रेल्वे कंपन्या वापर करीत आहेत. ही काच प्रथम इटालियन रेल्वेसाठी बनविण्यात आली.

दि फ्लेक्‍स सेप्टी ग्लास कंपनीने तयार केलेली ही काच इतकी मजबूत आहे की, त्यावर ताशी 200 मैल वेगाने जरी एखादी वस्तू येऊन आदळली तरी ती भंगून वस्तू आत येऊ शकत नाही. या काचेत मध्यभागी प्लॅस्टिकचा एक थर दिलेला आहे.

जातीय असंतोष पसरविणाऱ्या संस्थांवरही कारवाई होणार
नवी दिल्ली – देशात जातीय असंतोष पसरविणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जरूर ते अधिकार हाती घ्यावेत, म्हणून सरकार त्यासंबंधी कायदा बनविण्याच्या विचारात आहे. आज कॉंग्रेस नेत्यांच्या एका परिषदेत बोलताना गृहखात्याचे राज्यमंत्री पंत यांनी ही माहिती दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.