48 वर्षांपुर्वी प्रभात : ता. 25, माहे नोव्हेंबर, सन 1973

टीव्ही लवकरच खेड्यांत पोहोचेल

मुंबई, दि. 24 – नजिकच्या काळात दूरचित्रवाणीचा व्यापार विभाग सुरू होण्याची शक्‍यता नाही, असे माहिती व नभोवाणी खात्याचे सचिव ए. जे. किडवाई यांनी सांगितले. दूरचित्रवाणी काही वर्षांतच खेड्यापाड्यांत जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एअर इंडियाने टाळेबंदी पुकारली
नवी दिल्ली – एअर इंडियाने टाळेबंदी जाहीर केली, त्यामुळे देशातील विमान वाहतूक थंडावली आहे. विमान कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी नव्या पाळी विरुद्ध चळवळ सुरू केल्याने, टाळेबंदीचा निर्णय कंपनीने घेतला. 1971 साली कंपनीने अशी प्रथम टाळेबंदी केली होती.

कामगारांचे आंदोलन 12 नोव्हेंबरला सुरू झाले. कामगार व कंपनी यांच्या प्रतिनिधींच्या वाटाघाटीही गेले तीन दिवस चालू होत्या. पण त्या यशस्वी झाल्या नाहीत. एअर चीफ मार्शल लाल म्हणाले, नवी पाळी पद्धती राबविण्याचा व्यवस्थापकांचा निर्धार आहे. या मुद्द्यावर आम्ही माघार घेणार नाही. अर्थात तरीही कामगारांना वाटाघाटीची दारे खुली आहेत.

संकुचित स्वार्थासाठी लोकांना संकटात टाकणाऱ्यांचा निषेध
नवी दिल्ली – आपल्या छोट्याशा गटाच्या स्वार्थासाठी सामान्य जनता भीषण दारिद्य्रात खितपत पडलेली दिसत असतानाही जे लोक “राष्ट्रीय अर्थरचने’ची हानी करू पाहतात, त्यांचा पंतप्रधान इंदिरा गांधींनी कडाडून निषेध केला. राष्ट्रीय अर्थोत्पादनातील अन्याय्य असा जादा वाटा “पळवू पाहणाऱ्यांना’ तसे करणे अशक्‍य व्हावे म्हणून संघटित लोकमत निर्माण करण्याची हाक इंदिराजींनी दिली.

परकी आक्रमणाचे वेळी दिसलेली राष्ट्रीय एकजूट आजही आर्थिक आणीबाणीत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. किंमतवाढ आणि तुटवडा यामुळे सामान्य जनता कशी भरडली जात आहे त्याचा निर्देश राष्ट्रपती व पंतप्रधान या दोघांनीही आपापल्या भाषणांत केला. अर्थमंत्री ना. चव्हाण यांनी आर्थिक परिस्थितीबद्दल आशादायक चित्र रंगविले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.