48 वर्षांपूर्वी प्रभात | ता. 17, माहे जून, सन 1973

देशाची आर्थिकस्थिती लवकरच सुधारेल इंदिराजींचा विश्‍वास
बेलग्रेड, ता. 16 – भारतातील आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारेल आणि देशास प्रयत्नांची फळे मिळतील, असा विश्‍वास पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्यक्‍त केला.

येथील भारतीयांतर्फे इंदिराजींचे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी इंदिराजी बोलत होत्या. इंइिराजी व टिटो यांची आजही बोलणी झाली. अनेक प्रश्‍नांवर या नेत्यांचे मतैक्‍य असल्याचे या वाटाघाटी नंतर सांगण्यात आले.

पूंचचे पाणी पाकने तोडले!
जम्मू – जम्मू भागातील पूंच जिल्ह्यास पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्यास पाकिस्तानने बांध घातल्याने गेले दोन दिवस या भागात पाणी मिळत नसल्याचे कळते. पाकिस्तान व्याप्त भागात हा बांध घातला गेला आहे. यामुळे पूंच विद्युत केंद्रही बंद पडले आहे.

घाम गाळायची सवय जळली की संकटे दूर पळतात!
पुणे- “युद्ध होऊन रक्‍त सांडण्याची वेळ येऊ नये म्हणून शांतता काळात घाम गाळायची आवश्‍यकता आहे आणि एकदा घाम गाळायची सवय जडली की, संकटे दूर पळतात, असे उद्‌गार उद्योगपती आबासाहेब गरवारे यांनी गो. स. पारखे औद्योगिक मान पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी काढले.

पाकला शस्त्रे देणे म्हणजे सिमला करारास मागे टाकणे
वॉशिंग्टन – 1965 व 1971 च्या युद्धांमध्ये अमेरिकन शस्त्रे त्रयस्थ राष्ट्रातर्फे पाकला पुरविली गेली होती. सद्य परिस्थितीत तिसऱ्या देशामार्फेत पाकला अमेरिकेने शस्त्र पुरवठा केला तर ते फक्‍त भारता विरुद्ध असणाऱ्या शक्‍तीस प्रबळ करणारा नसून

सिमला येथे झालेल्या कराराच्या अंमलबजावणीस उशीर होण्याचे कारण ठरेल. सिमला कराराच्या अंमलबजावणीस उशीर व्हावा अशा स्वरूपाची अमेरिकेची धोरणे नाहीत, असे भारतीय राजदूत टी. एन. कौल म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.