पाकमध्ये डांबून ठेवलेल्या 127 बंगाली लोकांचे डाक्क्यात आगमन
डाक्का, ता. 11 – पाकिस्तानमध्ये अडकून राहिलेले 127 बंगाली आज दुपारी अफगाण एअर लाइन्सच्या एका खास विमानाने येथे आले.
या 127 जणांमध्ये 11 महिला, 7 मुले व पुष्कळसे खलाशी आहेत. पाकिस्तानमधून बांगलादेशाकडे पाठविल्या जाणाऱ्या 464 बंगाल्यांपैकी ही पहिली तुकडी आहे. या लोकांच्या स्वागतासाठी विमानतळावर फार मोठा जमाव जमला होता.
बंगाली लोकांची परत पाठवणी हे परिस्थिती निवळल्याचे चिन्ह
यूनो कचेरी – यूनोचे निर्वासित प्रश्नाबाबतचे कमिशनर प्रिन्स आगाखान यांनी केलेल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या व काही थोड्या बंगाली लोकांची पाकमधून बंगालकडे परत पाठवणी करण्यात आली आहे. ही माहिती यूनोचे सरचिटणीस डॉ. कुर्ट वॉल्ढीम यांनी येथे पत्रकारांना दिली.
रशियाचा भूमिगत अणु स्फोट
वॉशिंग्टन – सोव्हियत रशियाने भूगर्भात अणु स्फोट चाचणी घेतल्याचे येथील केंद्राने जाहीर केले आहे. अमेरिकन ऍटामिक एनर्जी एजन्सीच्या म्हणण्यानुसार ही चाचणी सोमवारी घेण्यात आली असून तिची शक्ती 20 ते 200 किलो टन्स या दरम्यान होती. यावर्षी रशियाने तीन चाचण्या घेतल्या.
प्रामाणिकपणा भोवला!
नैसजो (स्वीडन) – मोटार मेकॅनिक टेरमॅय जेबर्ग यांच्या आज असे लक्षात आले की, प्रामाणिकपणा दाखविणे नेहमीच योग्य असते असे नव्हे. एका सार्वजनिक टेलिफोन बॉक्समधून त्यांनी फोन केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, तेथे पैशांचे पाकीट राहिलेले आहे.
त्यात 65 क्राउन्स (12 डॉलर्स) होते. ते पाकीट घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये गेले व तेथे ते त्यांनी दिले. तेथे त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे स्वतःचे पैशाचे पाकीट त्याच टेलिफोन बॉक्सवर विसरले आहे. ते तेथे घाईने गेले तर पाकीट गायब. त्यांच्या पाकिटात 2700 क्राउन्स (600 डॉलर्स) होते.