पुणे – महापालिकेचा आदेश फेटाळल्याप्रकरणी युनिव्हर्सल हॉस्पिटलला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्याचे उत्तर 48 तासांमध्ये न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
बिल कमी करण्याच्या महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवली खासगी हॉस्पिटलने करोना बाधित रुग्णाकडून पूर्ण बिल घेतल्याचा प्रकार संबंधित हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडला होता. तसेच “जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे उपचाराविना मृत्यू होत आहेत. आम्ही तर तुम्हांला बेड उपलब्ध करून दिला,’ अशी भाषा करत पूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णाला सोडणारच नाही’ असा पवित्रा या हॉस्पिटलने घेतला होता.
संबंधित रुग्णाला डिस्चार्जच्या दिवशी 1 लाख 14 हजार 100 रूपयांचे बिल हातात ठेवले. रुग्णाच्या नातेवाईकांनी महापालिकेकडे त्याची तक्रार केली. या अर्जानुसार महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक आणि त्यांच्या टीमने या बिलातील जास्तीचे लावलेले 49 हजार 300 रूपये कमी केले आणि संबंधित रुग्णाकडून 64 हजार 800 रुपये घेण्याबाबत महापालिकेच्या सही शिक्क्याचे पत्र हॉस्पिटल प्रशासनाला दिले.
ते घेऊन नातेवाईक हॉस्पिटलमध्ये गेले असता, त्यांनी बिल कमी करण्याला नकार दिला. शिवाय महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नाईक यांचा कॉलही हॉस्पिटलच्या प्रमुखांनी उचलला नाही. त्यानुसार डॉ. नाईक यांनी रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे.
आतापर्यंत 94 लाखांचा परतावा
जास्त बिल आकारणाऱ्या रुग्णालयांच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. डॉ. मनिषा नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली एक टीम तयार करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत जादा बिलाची रक्कम कमी करण्यात येत आहेत. महापालिकेकडील दाखल तक्रारींमधून सुमारे 214 बिलांच्या प्रकरणांमधून सुमारे 94 लाख रुपये बिल संबंधित रुग्णांना परत देण्यात आले आहे.