पुणे – राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ पुणे विभागातील 4 लाख 75 हजार 197 शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये पुणे विभागातील शेतकऱ्यांना 3 हजार 249 कोटींचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील 1 लाख 52 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी बॅंकांकडून मागविली होती. त्यानुसार पाच जिल्ह्यांमधील जिल्हा सहकारी बॅंकांमधील 3 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी तर इतर बॅंकांमधून कर्ज घेतलेल्या 1 लाख 51 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील 1 लाख 52 हजार, सोलापूर-1 लाख 11 हजार, कोल्हापूर-60 हजार, सांगलीमधील 1 लाख 2 हजार आणि सातारा-49 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. त्यानुसार 4 लाख 5 हजार शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक आहे. तर अजूनही 69 हजार 492 शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही. आधार क्रमांक उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची यादी 7 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.