- सर्वांकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकली
पुणे – महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. त्यावर विचार करण्यासाठी स्वतंत्र समितीही नेमली आहे. असे असताना पालिकेच्या हक्काची असलेली मिळकतकराची थकीत रक्कम वसूल करणे प्रशासनाला कठीण झाले आहे. त्यातून केवळ 474 जणांकडे 1,218 कोटी रुपयांची मिळकतकर थकबाकी आहे.
मिळकतकराची एक कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची यादी “सजग नागरिक मंच’ने मागितली होती. त्यामध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेले थकबाकीदार केवळ 474 आहेत. परंतु, त्यांच्याकडील थकबाकी मात्र 1,218 कोटी रुपये आहे. त्यातील 50 प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असून, ती 375 कोटी रुपयांची आहेत. त्यातूनही दोन प्रकरणांचीच थकबाकी 221 कोटी रुपये आहे. अन्य रक्कम 48 प्रकरणांमधील आहे.
मोबाइल टॉवरची 273 प्रकरणे असून, ज्यात अडकलेली रक्कम 390 कोटी रुपये आहे. ही प्रकरणेही न्यायालयात प्रलंबित असल्याचे प्रशासनाकडून सांगितल्याचे सजगचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून या सर्व केसेसचा निकाल शीघ्र गतीने लागावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यातील किमान निम्म्या केसेसचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला तरी मनपाला 430 कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे.
या यादीत 49 केसेस दुबार कर आकारणीच्या आहेत. ज्यामध्ये अडकलेली रक्कम 136 कोटी रुपये आहे. ज्यांची शहानिशा करून त्या या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. या यादीत 28 प्रकरणे “डिस्प्यूट’ म्हणून दाखवल्या आहेत; ज्यात अडकलेली रक्कम 102 कोटी रुपये आहे. यातील समस्या तातडीने सोडवून पैसे वसूल करणे गरजेचे आहे. याशिवाय पाटबंधारे खात्याची थकबाकी 53.31 कोटी रुपयांची असून, त्याची वसुली महापालिका पाटबंधारे विभागाला देत असलेल्या पाणी पट्टीमधून करणे आवश्यक आहे, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे.