ता. 10, माहे जून, सन 1975
नवी दिल्ली – भारतीय वृत्तपत्रे व वृत्तपत्रिकांचे वाटप करण्यावर पाकच्या पोस्ट व टेलिग्राफ खात्याने बंदी घातली आहे. उभय देशांमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या करारानुसार भारतीय वृत्तपत्रे पाकमध्ये पाठविली जात. कोणतीही पूर्वसूचना न देता सदर बंदी घालण्यात आल्याचे रावळपिंडी नवा-इ-वक्तने सांगितले. तसेच कोणत्याही वृत्तपत्र व्यवस्थापकांना कृतीबद्दल पूर्वसूचना दिली नव्हती.
नवी विद्यापीठे स्थापन करण्याच्या योजना
नवी दिल्ली – देशाच्या निरनिराळ्या भागात विद्यापीठे स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला चालना मिळाली आहे. तसेच केंद्रीय मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पनाही केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. पाचव्या योजनेच्या काळात पद्दुचेरीत केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पथके
नवी दिल्ली – दिल्ली, मुंबई, कलकत्ता व मद्रास या चार बड्या शहरांत सरकारने खास आयकर पथके उभी केली असून श्रीमंत घरातील काळा पैसा बाहेर काढण्याची कामगिरी या पथकांवर सोपविण्यात आली आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही पथके उभारण्यात आली आहेत. यामुळे काळा पैशावर नियंत्रणही येईल.