सामाजिक बहिष्कारावर राज्यात बंदी घालणार
मुंबई, दि. 4 – सामाजिक बहिष्कार टाकण्यावर बंदी घालण्याची तरतूद करणारे एक विधेयक मांडण्याचे राज्य सरकारने योजिले आहे. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ही घोषणा केली. वसंतदादा आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, जमातीतील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर असा बहिष्कार टाकण्यावर बंदी करण्याची तरतूद असलेले एक बिनसरकारी विधेयक पूर्वी विधिमंडळात मांडण्यात आले होते, परंतु ते मागे घेण्यात आले. आता सामाजिक बहिष्कार टाकणे हा दखलपात्र गुन्हा समजण्यात यावा, अशी तरतूद केली जाईल.
पुण्यात रेशन कार्डावर गोडे तेल
पुणे – पुणे अन्नधान्य वितरण विभागात पाच जूनपासून रेशन कार्डावर एक किलो खाद्य तेलाची विक्री करण्यात येणार आहे. तेलाचा भाव प्रत्येक किलोत 8 रु. 50 पैसे असा असून तूर्त शहरातील 32 केंद्रांतून खाद्य तेलाची विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने पुणे शहरासाठी दररोज वीस टन खाद्य तेल पुरविण्याचे ठरविले आहे. येत्या थोड्याच दिवसांत सर्व स्वस्त धान्य दुकानातून खाद्य तेल विक्रीस उपलब्ध होईल. कार्डावर देण्यात येणारे खाद्य तेल मोहरीचे आहे आणि खाद्य तेल म्हणून उपयुक्त आहे.