घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश व्हावा
नवी दिल्ली – घटनेत लोकांची मूलभूत कर्तव्ये व बंधने यांचा समावेश करण्यात यावा, अशा दुरुस्ती सूचनेसह घटना दुरुस्ती शिफारशींचा ठराव आज अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने मंजूर केला. डॉ. करणसिंग यांनी ठरावावर मांडलेल्या यासंबंधीच्या सूचनेत देशात एकी व अखंडता राखणे, घटनेतील नियमानुसार व देशाच्या कायद्यानुसार कृती करणे, प्रत्येक क्षेत्रात शिस्त पाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण इत्यादी कर्तव्याचा व बंधनाचा समावेश आहे. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशी आज या ठरावाद्वारे मंजूर करण्यात आल्या.
इंदिरा गांधींची भाषणे व लेख रशियन भाषेत प्रसिद्ध
मॉस्को – येथील “न उका’ प्रकाशनगृहाने भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे लेख, भाषणे व मुलाखती यांचा संग्रह रशियन भाषेत प्रसिद्ध केला आहे. भारत-सोव्हियत मैत्रीच्या सुवर्णशलाका या ग्रंथाच्या अनेक पानांतून आढळतात. त्यातून आशिया खंडातील 60 कोटी लोकसंख्येच्या देशापुढील अनेक प्रश्न चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. इंदिरा गांधी तिसऱ्यांदा मॉस्कोला भेट देतील. या भारत-सोव्हियत शिखर भेटीमुळे भारत व सोव्हियत संघराज्य यांच्यामधील मैत्री अधिक बळकट होईल नि फलदायी सहकार्याचा विस्तार होईल.