फिल्म इन्स्टिट्यूटची चित्रपट शाखाः 3 फेब्रुवारीला सुरू
पुणे, दि. 16 – डिप्लोमा चित्रपटात भूमिका देण्याच्या प्रश्नावरून 24 डिसेंबर रोजी बंद पडलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या चित्रपट शाखेचे सर्व वर्ग 3 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होतील, असे इन्स्टिट्यूटचे संचालक गिरीश कर्नाड यांनी जाहीर केले. अभिनय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी नसिरुद्दीन शाह यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शुटिंग कार्यक्रमात अडथळा आणला जाणार नाही असे सांगितले.
विदेशी चित्रपटांची पुन्हा आयात
पुणे – पुढील महिन्यापासून देशात पुन्हा परदेशी चित्रपट दाखविले जाणार आहेत. या महिनाअखेरीस सुमारे 150 चित्रपटांच्या आयातीसंबंधाच्या करारावर सह्या होतील. दोन वर्षांपासून सरकारने परदेशी चित्रपटांवर बंदी घातलेली आहे.
पुण्यात भरपूर धान्यसाठा
पुणे- गोदी कामगारांचा संप सुरू झाला असला तरी शहरासाठी लागणारा भरपूर अन्नसाठा उपलब्ध असल्याने काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असा खुलासा अन्नधान्य वितरण अधिकारी डांगे यांनी केला. गोदी कामगारांच्या संपामुळे शहरात बाहेरून होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबला तरी एक महिनाभर पुरेल इतके धान्य आपल्याजवळ असल्याचेही ते म्हणाले.
वाचक व संपादक यांचे दरम्यान संवाद प्रस्थापित होणे जरूरी
कोल्हापूर – वाचक वर्ग व संपादक यांच्यामध्ये एक प्रकारचा संवाद निर्माण होण्याची गरज आहे, असे विचार रसरंगचे पोतनीस यांनी वृत्तविद्या विभागात विद्यार्थ्यांबरोबर केलेल्या चर्चेत व्यक्त केले. हल्लीच्या काळात इंग्रजी वाचन कमी होत आहे याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले, पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यास सतत लेखन व वाचन या सवयी हव्या असणे जरुरीचे आहे.