फॅसिस्ट प्रवृत्ती वाढत आहे पंतप्रधान इंदिराजींचा इशारा
मंगलोर, दि. 11 – देशामध्ये फॅसिस्ट प्रवृत्ती वाढत असून काही विशिष्ट विरोधी पक्ष, काही गट, काही व्यक्ती यासाठी प्रयत्नशील आहेत, असा इशारा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिला. नेहरू मैदानावर झालेल्या प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधान इंदिरा गांधी बोलत होत्या. या फॅसिस्ट प्रवृत्तीची तुलना हिटलरच्या वेळी जर्मनीत असलेल्या परिस्थितीशी करून त्या पुढे म्हणाल्या, खोट्या प्रचारामुळे देशाचेच अंतिम नुकसान होईल.
कारण इंदिरा-हटाव व कॉंग्रेसविरोध याशिवाय विरोधी पक्षाकडे कोठलाच भरीव कार्यक्रम नाही. लोकांनी आंदोलनात भाग न घेता आपापल्या क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी ऐक्याने प्रयत्न करावेत. “कॉंग्रेस पक्ष साम्यवादाकडे झुकतो आहे’, या आरोपावर टीका करताना त्या म्हणाल्या, कॉंग्रेस पक्ष आपल्या ध्येयापासून विचलित झालेला नाही. कम्युनिस्ट जर कॉंग्रेसला मदत करीत असतील तर त्यांचे स्वागतच केले जाईल.
अपरिवर्तनीय घटना जगात कोठेही नाही
पुणे- घटनेचा कोणताही भाग संसद दुरूस्त करू शकते, हे आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. घटनेचा अन्वयार्थ लावताना, घटनेत नमूद केलेल्या तरतुदींनुसार संसदेत जे लोकमत व्यक्त होते त्याची कदर करणे ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी नाही का?
या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयच देऊ शकेल. या उत्तराची जनता पंचवीस वर्षे वाट पाहते आहे. सर्व काळात व सर्व परिस्थितीत अपरिवर्तनीय ठरेल अशी घटना जगात कोठेही अस्तित्वात नाही, असे उद्गार मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश न्या. जी. एन. वैद्य यांनी भाषणात काढले.
मुदतपूर्व निवडणुका घेण्याची गरज नाही
मद्रास – संघटना कॉंग्रेसचे नेते कामराज आज येथे भाषण करताना म्हणाले की, मुदतपूर्व निवडणुका घेण्याची जरुरीच नाही. कारण सत्तारूढ पक्षाला आताच पार्लमेंटमध्ये दोनतृतीयांश बहुमत आहे.