काळा पैसावाल्यांसाठी मुदतवाढ नाही
मद्रास, दि. 4 – दडविलेली संपत्ती आपण होऊन जाहीर करण्यासाठी असलेली 31 डिसेंबर ही मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही, असे आज केंद्रीय महसूल खात्याचे राज्यमंत्री प्रणव मुखर्जी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
ज्यांना परकीय चलन गैरव्यवहार प्रतिबंधक व स्मगलिंग प्रतिबंधक कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आलेले नाही, अशा सर्व लोकांना ही सवलत लागू आहे, असे सांगून ते म्हणाले की, 1900 लोकां विरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले आहेत. 31 डिसेंबर ही मुदत आणखी वाढवून द्यावी अशीही मागणी पुढे येत होती.
पाकिस्तानमध्ये कायदेभंग आंदोलन सुरू होणार
इस्लामाबाद – भुट्टो सरकारविरुद्ध कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज लाहोर येथे विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. सत्तारूढ पीपल्स पार्टीच्या हटवादी धोरणाविरुद्ध नॅशनल असेंब्लीतील व प्रांतिक असेंब्लीतील, सर्व विरोधी पक्षांचे सदस्य “योग्य वेळी’ राजीनामे देतील असेही आज त्यांच्या गोटांतून सांगण्यात आले. विरोधी पक्षांनी मागणी केली की भुट्टोंनी राजीनामा द्यावा व सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निवडणुका घ्याव्यात.
गोदावरी पाणीवाटव चर्चा
नवी दिल्ली – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री सेठी व ओरिसाच्या मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांनी गोदावरी पाणीवाटपासंबंधी चर्चा केली.