संततिप्रतिबंधक शस्त्रक्रियांत महाराष्ट्र प्रथम
नवी दिल्ली, दि. 21 – संततिप्रतिबंधक शस्त्रक्रियांच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरपर्यंत 1 लाख 20 हजारहून अधिक संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिना हा देशात “कुटुंब नियोजन महिना’ म्हणून पाळला गेला. देशात फेब्रुवारीअखेरपर्यंत 20 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या. याबाबतीत वार्षिक लक्ष्य जे आहे, त्याच्या 80 टक्के भाग अशा रीतीने पूर्ण झाला आहे. फेब्रुवारीत देशात 3.5 लाख शस्त्रक्रिया केल्या गेल्या. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. संपूर्ण भारतात हा कार्यक्रम राबविला जात आहे.
देशव्यापी पदयात्रा
इंदूर – मध्यवर्ती भूदान समितीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद 12 एप्रिल रोजी बंगलोरला देशव्यापी पदयात्रेचे उद्घाटन करतील. 18 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या पदयात्रा कार्यक्रमात उपराष्ट्रपती जत्ती व दहा मुख्यमंत्री सहभागी होतील.
औद्योगिक कायद्यात दुरुस्ती
मुंबई – औद्योगिक कलह कायद्यात दुरुस्ती करण्याची तरतूद असलेले विधेयक काल विधान परिषदेने मंजूर केले. कामगार न्यायालयात निर्वाचन अधिकारी म्हणून कामगार खात्यातील लोकांना नेमण्याची त्यात तरतूद आहे.
भारत-उत्तर कोरिया करार
नवी दिल्ली – भारत व उत्तर कोरिया यांच्यात व्यापारी करार झाला. त्यानुसार 27 कोटी रुपयांचा व्यापार होईल.