निवडणुकीत दूरचित्रवाणी, रेडिओचा वापर नाही
जयपूर, दि. 30 – दूरचित्रवाणी व रेडियो यांचा वापर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षासाठी केला जाणार नाही, असे माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री विद्याचरण शुक्ला म्हणाले.
ही माध्यमे केवळ सार्वजनिक सेवेसाठी आहे. ही माध्यमे निवडणुकीत निःपक्ष राहतील. निवडणुकीच्या काळात जनसंपर्क माध्यमांनी देशात असे वातावरण निर्माण करावे की, भीती न बाळगता कोणत्याही व्यक्तीस स्वाभिमानाने मतदान करता आले पाहिजे.
जागतिक लोकसंख्येपैकी निम्मी वस्ती आशियात
यूनो – जागतिक लोकसंख्या 1975च्या मध्यास 3,967 दशलक्ष इतकी होती. एक वर्षाच्या काळात 77 दशलक्ष वाढ झाली. या प्रमाणात लोकसंख्या वाढल्यास 37 वर्षांत ती दुप्पट होईल. निम्म्यापेक्षा जास्त लोक आशिया खंडात राहतात. हे प्रमाण 56.9 टक्के आहे.
टेलिफोन डिरेक्टरी मराठीत
पुणे – पुणे टेलिफोन्सतर्फे नवीन सुधारित डिरेक्टरीचे प्रकाशन झाले. नवीन कनेक्शन देण्यात आलेल्या डिरेक्टरीची एप्रिल-मे मध्ये मराठी आवृत्तीसुद्धा उपलब्ध होईल.