पुणे – खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी 45 हजार 474 क्युसेकने सुरू करण्यात आलेला विसर्ग सोमवारी रात्री उशिरापर्यंत कायम होता. शहराच्या मध्यवस्तीतील लकडी पूल (संभाजी पूल), झेड ब्रीज (काकासाहेब गाडगीळ पूल), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल (बालगंधर्व पूल) येथून खळाळत्या नदीचे दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. सध्या पानशेत-9,889 तर वरसगाव धरणातून 8,535 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, पाण्याचा ओघ लक्षात घेता विसर्ग सुरूच ठेवण्यात येणार आहे.