धक्कादायक !अमेरिकेत एकाच दिवशी ४ हजार ५०० कोरोना रुग्णांचा मृत्यू

वॉशिंग्टन : कोरोनाचा कहर अजूनही जगभरात सुरूच आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगाला धडकी भरली आहे. आतापर्यंत जगात सुमारे ९.२० कोटी जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आले आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, एकाच दिवशी ४ हजार ५०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोना मृत्यू यात वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी एकाच दिवशी अमेरिकेत तब्बल ४ हजार ५०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एका दिवशी मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. यासह अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ८९ हजार ५९९ झाली आहे. तर, कोरोनाचे २ लाख २२ हजार १२१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत तब्बल २ कोटी ३३ लाख ६८ हजार २२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेत कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असली तरी तेथील कोरोनाचे संकट अद्यापही गहिरे होताना दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत ९० लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, तरीही कोरोनाचा आकडा कमी होताना दिसत नाही. यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

दरम्यान, नेदरलँडमध्ये लॉकडाऊनमध्ये कोणतीही सूट देणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नेदरलँडकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेदरलँडमध्ये आतापर्यंत ८ लाख ८३ हजार १३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १२ हजार ५६३ वर पोहोचली आहे. फ्रान्समध्ये कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आला असून, पुन्हा लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे तेथील सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.