मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या तीन दिवसापासून वाढत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील शक्य मंदीमुळे डॉलर कमकुवत आहे. परिणामी कालपासून भारतीय रुपयाच्या मूल्यांमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. शुक्रवारी रुपयाचा भाव 45 पैशांनी वाढून 79.24 रुपये प्रति डॉलर या पातळीपर्यंत गेला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार डॉलरच्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करीत असल्याचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे रुपयाला चांगला आधार मिळत आहे.
कालही रुपयाचा भाव 22 पैशांनी वाढला होता. जागतिक पातळीवरील सशक्त सहा चलनांच्या तुलनेत डॉलरचा भाव कमी झाल्यानंतर भारतीय रुपयाचे मूल्यही वधारू लागले असल्याचे दिसून येते. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 1,637 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली.
भारतामध्ये मागणी इतके पुरेसे परकीय चलन उपलब्ध होऊ लागल्याचे वातावरण असल्यामुळे रुपयाच्या मूल्यांमध्ये सुधारणा होत आहे, रुपयाचे मूल्य घसरू नये म्हणून रिझर्व्ह बॅंकेने गेल्या पंधरवड्यामध्ये बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. देशातील कंपन्यांना परकीय कर्ज घेण्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर परदेशातील गुंतवणूकदारांना भारतीय रोखे खरेदी करण्यासाठी सवलती दिल्या आहेत. परदेशी चलनातील भारतातील ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या कारणामुळे भारतीय रुपयाचे मूल्य वधारत असल्याचे दिसून येत आहे.